Tuesday, August 10, 2010

प्रेम कहाणी !

                                                                    प्रेम कहाणी !

ती येणार हे त्याला माहीत होतं. मैलो मैली प्रवास करून शेवटी ती त्याच्या जवळच येणार होती. अमाप अडथळे आले, तरी ती त्यावर मात करून त्याच्या  जवळ येते आणि तो अनंता पर्यंत तिची वाट बघत राहतो. अखेरीस ती येते परंतु त्याची भेट घेतल्यावर नाहीशी होते.... झिरपून जाते. समुद्र किनारी घडलेली  ही त्या लाटेची त्या  किनार्याशी जुडलेली हि प्रेम कहाणी. काही क्षणा साठी का असेना, ती उसळती लाट सगळ्या अडथळ्यांवर मात करून मैलो प्रवास करते ते फक्त त्या क्षणिक आनंदा साठी ... त्या अमृतुल्य भेटी साठी !!! किती निस्वार्थी आणि पवित्र प्रेम आहे त्या लाटेचे त्या किनार्याशी. तो किनारा सुद्धा त्या लाटेची वाट अनंता पर्यंत पाहत राहतो. त्या उसळत्या लाटेचा शेवट त्या किनार्याच्या प्रेमाच्या कुशीत जाऊनच होतो जणू तिला मोक्ष त्याच्या भेटीतूनच प्राप्त होणार आहे

समुद्र काठी त्या लाटेकडे पाहत असताना हि विचारांची लाट माझ्या मनात येऊन आदळत होती. त्यात समुद्राची लाट येत होती आणि सवाई प्रमाणे झीरपून जात होती. निसर्ग क्षणा क्षणाला आपल्याला आपल्या आयुष्याची कहाणी दर्शवतो असे वाटायला लागले. त्या लाटेला कसलीच अपेक्षा नसते त्या किनाऱ्या कढून. केवळ त्याची भेट घडावी म्हणून तिचा जीवतोड प्रयत्न असतो. काय हाशील होत असेल तिला तिच्या जीवाचा असा त्याग करून? ह्याला प्रेम असे म्हणता येईल का

जिथे बघावं तिथे प्रेमाची जणू लाटच आलेली दिसते. एक करतो म्हणून दुसरा. बऱ्याच मित्र मैत्रिणींना ह्या प्रेम प्रकरणात अडकलेले पाहिले आहे. तो अनुभव जणू कमी होता कि माझ्या कामाच्या संधर्भात सुद्धा असे दावेदार येत असतात. प्रेमाच्या गोष्टी बऱ्याच केल्या जातात परंतु प्रेमाचा अर्थ माहिती असतो तरी कि नाही ह्यावर शंका येते. शंका कशाला... नाहीच असे ठामपणे म्हटलं तरी ते चुकीचे ठरणार नाही.

हल्ली शाळेतली मुलं सुद्धा गर्ल फ्रेंड / बॉय फ्रेंड च्या गोष्टी करताना पाहून त्रास होतो कि हल्ली एका पवित्र नात्याला अतिशय किरकोळपणे संबोधले जाते. हे सुद्धा पाहिले जाते कि कॉलेज मधील मुलांना गर्ल फ्रेंड असणं म्हणजे जणू एक प्रकारचा ' award display' असतो आणि मुलीं साठी बॉय फ्रेंड असणं म्हणजे आपण किती 'attractive' आणि 'desirable' आहोत ह्याची पावती. हे प्रेम नसून शारीरिक आकर्षण आहे हे त्या वयात ते स्वीकारू शकत नाहीत आणि हे सत्य कबूलही करत नाहीत कारण भावनां पेक्षा शारीरिक आकर्षण जास्त आकर्षित वाटतं. ह्यात प्रेम कुठेतरी लुप्त झालेले दिसते कारण जर ते केवळ भावनात्मक प्रेम असतं तर शारीरिक आकर्षणाकडे दुर्लक्ष करून सुद्धा प्रेम दर्शवता आले असते.ह्याच शारीरिक आकर्षणाला प्रेमाची खोटी उपमा दिली जाते परंतु खरा प्रेम कशाला म्हणतात हे त्यांना कधी कळत सुद्धा नाही.  

केवळ एकमेकांना पाहून आपण एकमेकान साठी बनले आहोत अशी धारणा केली जाते ह्याला शारीरिक आकर्षण म्हणावे कि प्रेमात पाडण्याचे विलक्षण आकर्षण. त्या वयात आपली एखादी गर्ल फ्रेंड / बॉय फ्रेंड असणं हेच त्यांच्या साठी एक मोठा पराक्रम केल्या प्रमाणे आहे. परंतु त्या व्यक्तीची ओळख झाल्यावर कळून चुकतं कि आपण एकेमेकां साठी बनलो नाही आहोत. तो पर्यंत प्रेमी आपल्या जागा बदलून नवीन प्रेमाच्या शोधात जातात परंतु आधीच्या अनुभवा पासून वेगळे असे काहीच नसते. काही ह्याच आकर्षणाला प्रेम समजून लग्न बंधनात सुद्धा बांधले जातात परंतु 'प्रेम' कशाला म्हणतात ह्या सत्य पासून ते आयुष्यभर वंचित राहतात.  

आपल्याला बरीच माणसे आवडत असतात परंतु आपण सगळ्यांवर प्रेम नाही करू शकत. 'प्रेमहा शब्द किती सहज आणि किरकोळ पणे वापरला जातो कि त्याचे पावित्र्य नाहीसे झाले आहे. प्रेम दर्शवण्या साठी भावतीक लेन -देन करण्याची अजिबात आवश्यकता नसते हे कोणी का नाही जाणले? कुणासाठी निस्वार्थीपणे वाट्टेल ते करण्याची तयारी आणि त्या व्यक्ती साठी कायम चांगलेच इचछीले हेच प्रेमाचे प्रतीक नाही का?      

खऱ्या प्रेमाची परिभाषा कोणाला आत्मसात करताच आलेली नाही असे वाटतेखरे प्रेम हे कधीच येवदे निथळ नसते आणि ते कोणत्याही कारणास्तव बदलत नाही. मुख्यतः प्रथम दर्शनी जे प्रेमात पाडण्याचे स्वतःला आश्वासन देतात तेच मुळात चुकीचे आहे असे मला वाटते कारण एखादी व्यक्ती आपल्याला प्रथम दर्शनी आवडू शकते परंतु प्रेमात पडायला त्या व्यक्तीला कितीसे ओळखत असतील? भरपूर भांडल्यावर, ओळख पूर्णतः पटल्यावर, त्या व्यक्तीतले सगळे दोष जाणून सुद्धा त्या दोषांसकट त्या व्यक्तीवर तेवढेच प्रेम करावेसे वाटत असेल तर ते प्रेम म्हणू शकतो नाही का?                      

 सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम कोणत्याही अटीवर नसावं. कोणावर प्रेम केले म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्यावर प्रेम करावं असा हट्ट का ? ह्याला प्रेम म्हणूच शकत नाही. हा व्यापार झाला नाही का? एक हाथ ले दुसरे हाथ दे !!! तू माझ्यावर प्रेम केलस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करिन हा विचारच मुळात दर्शवतो कि ह्याला प्रेम म्हणत नाही. मग 'प्रेम' कशाला म्हणतात? कोणी आपल्या साठी काहीही करावे अशी अपेक्षा नसताना त्या व्यक्तीसाठी निस्वार्थीपणे वाट्टेल ते करण्याची उच्च असणे म्हणजेच 'निर्मळ प्रेम', नाही का?                                                                                                                                                              

प्रेमाची परिभाषा खूप कठीण आहे आणि प्रत्येक जण आपापला अनुभव त्याला जोडतो. जसा अर्थ लावावा तसा लागतो. प्रेमाची पावती मात्र केवळ प्रेम अनुभवणारा देऊ शकतो, प्रेम करणारा नाही. जो निर्मल प्रेम करतो त्याला केवळ देणे माहिती असते... तो हिशोभ मांडत नाही. ते प्रेम समोरच्याने अनुभवलेच नाही म्हणजे त्या प्रेमात तरी कमी असेल किंव्हा त्या व्यक्तीने जाणून बुजून आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली असावी. त्यामुळे देणाऱ्या पेक्षा स्वीकार करणाऱ्याला कळू शकते प्रेमाची परिभाषा.                                                                                                              

प्रेम म्हणजे केवळ आपले सर्वस्व देत राहणे आणि परतफेडीची अपेक्षा ना बाळगणे. जेव्हा प्रेम निर्मल असतं तेव्हा असे आढळून येते कि एक व्यक्ती दुसऱ्या पेक्षा खूप अधिक प्रेम करते. ह्या प्रेमाला कसलाही आधार लागत नाही, केवळ सोबत लागते. त्याला केवळ त्या एका व्यक्तीची सोबत लागते ज्या मुले तो कोणत्याही अडथळ्यांना धैर्याने समोरे जाऊ शकतो. ह्या क्षणी मला कवी चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आठवली, सीजि. म्हणतात, " तू सोबत असलीस कि मला माझा हि आधार लागत नाही. तू फक्त सोबत रहा, मी दुसरे काही मागत नाही." 

आधार आहे आता केवळ आठवणींचा. त्या समुद्राकडे पाहता पाहता अश्या विचारांच्या लाटा येऊन गेल्या आणि मी त्या किनाऱ्या पाशी येणाऱ्या लाटांकडे तेवढ्याच प्रेमाने पाहत होते. आठवणींचा समुद्र माझ्या मनात साठला होता. मनातल्या आठवणीं सारख्या त्या लाटा येऊन त्या किनाऱ्यावरच्या वाळूच्या भावना जागृत करत होत्या. जिथे भावना तिथे आठवणी असणारच. किनारा त्या लाटेच्या आठवणी घेऊन अनंता पर्यंत तिथेच राहिला आहे कारण आता तिच्या (लाटांच्या) आठवणींतून सुटका नाही, मी आपले माझ्या आठवणींचे गाठोडे  बांधले आणि त्या किनार्याच्या वाळूतून चालत घरी यायला निघाले. तिथली वाळू पायाला चिकटत होती, ती हाताने झाडून काढताना स्वतःचा हाथ आवरला.त्या लाटेची आणि त्या किनाऱ्याची भेट माझ्या पायाला एका स्मरणात जतन केलेल्या वस्तू सारखी चिकटली होती. मला त्या समुद्र किनार्याच्या आणि लाटेच्या प्रेम कथेत रंगून जायची इच्छा झाली आणि त्यांच्या गोड़ भेटीतले प्रेम मनात घेऊन निघाले



Friday, April 16, 2010

शब्द !

 

शब्दाला रूप नसतं, आकार नसतो, शब्द वाळवावे तसे वळतात, शब्द तोडावे तसे तुटतात. काहीही म्हटलं, तरी शब्दांना भावना मात्र नक्की असतात. शब्दांवर अमाप प्रेम करणारी माणसं आहेत ज्यांनी शब्दांना आकार दिला, सुंदर रूप दिले आणि त्याच सुंदर शब्दांचा संच करून आपल्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग दाखवला. ह्या लेखणीतूनच आपले  आयुष्य जुडले गेले आहे आणि आयुष्याचा अर्थ समजण्याची क्षमता मिळाली आहे. 

भावना प्रत्येकाच्या मनात असतात, परंतु त्या व्यक्त करणे  सर्वाना जमतच असं  नाही. काही जणांना आपल्या मनातली भावना व्यक्त करणं कठीण नसतं परंतु काही कमनशिबी व्यक्ती इच्छा असूनही आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. 

लेखक आपल्या मनात दडलेल्या भावनांना रूप देतो जेणेकरून  सर्व साधारण मनुष्य आपल्या भावना अनुभवू शकतो आणि त्या मांडायला त्याला लेखकाच्या लेखणीचा आधार मिळतो. हल्ली 'chat' च्या जमान्यात मनातल्या भावना व्यक्त करणं किती सोप्पा झालाय कारण चारोल्यातून किव्हा शायरीतून मनातल्या भावना एकमेकान पर्यंत पोहोचवणं अगदी सहज झाले आहे. ह्या क्षणी मला एक इंग्लिश  गाण्याचे शब्द आठवले जे Boyzone ह्या ग्रूपनि गायले आहे. गाण्याचे नाव आहे 'Words', ज्यात एक ओळ आहे, " Its only words and words are all I have to take your heart away."


मनुष्य जन्म आपल्या नशिबी आला हे आपलं अहो भाग्य आहे, जो शेकडो वर्षानंतर एका आत्म्याला लाभलेला एक अमूल्य योग आहे. देवाच्या ह्या सुंदर देणी मुळे आपण आपले विचार डोक्यात मांडू शकतो, हृदयात अनुभवू शकतो आणि तेच शब्दात मांडून व्यक्त करू शकतो. हा लाभ इतर प्राणी मात्रांना नाही लाभलेला परंतु मनुष्य ह्या अनमोल देणीचा कितीपत योग्य उपयोग करतो? 

शब्दांनी माणसे  जशी जोडता येतात तशी तोडणे हि कठीण नाही. शब्द उच्चारून नाती बांधली जातात किव्हा तोडली जातात तसेच शब्द न उच्चारून सुद्धा नाती बनतात किव्हा बिघडतात. हीच शक्ती आहे ह्या अनमोल देणीची ज्याचा योग्य तो उपयोग करण्याचे सामर्थ्य केवळ मनुष्याला लाभला आहे. 

देवानी  आपल्याला भावना दिल्या, त्या व्यक्त करण्या साठी शब्द दिले, परंतु मनुष्य ह्या शब्दांचा उपजोग किव्हा दुरुपयोग अधिक निंदास्पद, किव्हा नकारात्मक भावना व्यक्त करण्या साठी करतो असं नाही का जाणवत? समोरच्याला दुखवणारे शब्द किव्हा कोणाचा दुस्वास करणारे शब्द जास्त कानी पडतात असं नाही का आपण अनुभवले? परंतु प्रेमाचे दोन शब्द किव्हा आपुलकीची दोन वाक्य, कोणाची प्रशंसा, हे शब्द केवळ कादंबरी पुरते मर्यादित आहेत का? ज्या गोष्टी आपण वस्तुस्थितीत अनुभवू शकत नाही, त्या दुर्लभ भावना  आणि शब्दांची ओळख व अनुभव आपल्याला आपले लेखक व कवी मंडळी लेखा व कविते द्वारे करून देतात. 

शब्दांना फुला प्रमाणे वेचावे, जपावे आणि प्रेमाने त्या शब्दांची उधळ करावी कारण शब्दांसारखे शक्तिशाली शास्त्र कोणतेच नाही. लेखणीची ताकद तलवारी पेक्षा जास्त असते. तलवारीचे घाव शरीरावर तर लेखणीचे घाव उरावर लागतात. प्रेमाच्या दोन शब्दाने कोणतीही  लढाई जिंकणं अशक्य नाही तसेच शब्दांच्या दुरुपायोगानी जिंकलेली लढाई हरायला वेळ लागत नाही. 

जेष्ट कवी सुरेश भट्ट यांनी लिहिलेले मराठी अभिमान गीत आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा नवीन पिढीच्या कानी पडले. अतिशय सुंदर रीत्ये संगीतकार कौशल इनामदारनी एका नव्या चालीवर कवी सुरेश भट्टचे शब्द गुंतले आहेत. ह्या प्रयोगामुळे आजच्या पिढीला शब्दांचे मोल कळले आणि ह्या पिढी पुढे हे गीत मांडण्याचा संकल्प यशस्वी रीत्ये पूर्ण झाला. ह्या गाण्याला युवा पिढीने सुद्धा सलामी ठोकली आणि अप्रतिम प्रतीसाध दीला. तेव्हा शब्दाचं महत्व आणि जाण हि काही जणांना तरी आहे हे पाहून मनाला सुकून मिळाले. आज पुन्हा एकदा मराठी माणसांच्या मनात मराठी अस्मिता जागृत करण्याचे कार्य कवी सुरेश भट्ट च्या ह्या कविते मुळे झाले आहे कारण केवळ  त्यांच्या शब्दांमुळे ह्या युवा संगीतकाराला ह्या शब्दांना वेगळे रूप देण्याचे उत्तेजन मिळाले. नवीन पिढीचे पसिद्ध कवी संदीप खरे यांच्या प्रत्येक कवितेत सर्व साधारण माणसाच्या भावना दडलेल्या दिसतात. त्या शिवाय 'दमलेल्या बाबाची कहाणी'  ऐकून स्त्री असो किव्हा पुरुष, लहान मुल असो किव्हा थोर, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंची धार उगाच व्हाहत नाही. शब्दांची टाकत पुर्शी अहंकाराला सुद्धा ठेचू शकते हे संदीप खरेंच गीत सिद्ध करतं. आपले लेखक, आपले कवी यांनी शब्दांना एकत्रित करून जीवनाला निरनिराळ्या दृष्टीकोणाशी परिचय घडवून दिला. ह्याच आपल्या महान लेखकांना आणि कवींना  माझे नम्र अभिवादन आणि हा लेख त्या महान लेखकांना आणि कवींना समर्पित. शब्दांची टाकत अशी न्यारी. ह्या शब्दांना योग्य रूप देणाऱ्या ह्या सर्व शिल्पकारांना माझे नम्र अभिवादन.