जरा विसावू ह्या वळणावर !
"तसे आपण सगळेच निरागस असतो जन्मानंतर थोडा वेळ, मग सुरु होतो आपल्याशी या बनेल आयुष्याचा खेळ." कवी चंद्रशेखर गोखलेंचे हे शब्द मला सतत माझ्या लहानपणाची आठवण करून देतत. आई वडिलांच्या छाये खाली आपण वाढलेलो असतो. इतकं प्रेम आणि विश्वास ठेवतो आपण त्यांच्यावर की त्यांनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला जणू देवआज्ञाच. प्रत्येक मुलाला आपल्या आई वडिलांवर विश्वास असतोच परंतु त्या निरागस वयात त्या बाळाला चांगल्या वाईटाची जाण नसते. आई वडील जे काही बोलतात किंव्हा शिकवतात ती त्यांच्या साठी काळ्या दगडावरची रेषा.
आईवडिलांची शिकवण आणि आयुष्याकडे पाहण्याची एक सकारात्मक प्रवृत्ती लहानपणीच माझ्या अंगवळणी पडली. जग किती सुंदर आहे आणि सुरक्षित आहे ह्यावर विश्वास बसत गेला कारण अश्याच सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात मी वाढलेले. बालपण सर्ल आणि यौवनात निरनिराळे अनुभव येत गेले. तेव्हा जाणीव झाली की जग तेवडा सुरक्षित नाही जेवडे आपण लहानपणी समजायचो. आपले सुरक्षा कवच केवळ आपल्या कुटुंब आणि नातेवाईकां पुरते मर्यादित आहे असा समजून सावध झाले. "अनोळखी माणसांशी बोलू नये." आईची ही शिकवण लक्षात होती परंतु स्वतंत्र मार्गावर जेव्हा जीवनाची वाटचाल सुरु झाली तेव्हा कळून चुकले की ते मर्यादित जग सुद्धा सुरक्षित नाहीच. त्या क्षणाला ती निरागसता पूर्णपणे मिटून गेली आणि ह्या बनेल आयुष्याचा खेळ लक्षात आला.
हल्ली लैंगिक छळवणूकि बद्दल आपण असंख्य अश्या गोष्टी ऐकतो. हे प्रकार केवळ अशिक्षित किव्हा खालच्यावर्गाच्या लोकांमध्ये घडतात असे नाही परंतु सुशिक्षित, उच्च घराण्यात सुद्धा हे प्रकार घडत अस्तत हि गोष्ट बरेचजण स्वीकारणार नाहीत परंतु हे सत्य नाकारूही शकत नाहीत. फरक केवळ येवडाच की त्यांनी केलेला लैंगिक छल उघडकीस येतो आणि सुशिक्षित लोकांवर परिवार आणि नातेवाईकांच्या प्रेमाचे पांघरून ओढले जाते. लैंगिक छळवणूक ही काही नवीन गोष्ट नाही हे आपल्या सर्वाना माहीतच आहे आणि ती गैर आहे हे सुद्धा सर्वाना माहित आहे. आपण हे जाणून सुद्धा आपल्या पैकी एकानी तरी ही छळवणूक बंद करण्या साठी काही प्रयत्न केले आहेत का?
आपल्या ऐकिवात अश्या बर्याच घटना घडतात परंतु त्या ऐकून न ऐकल्या सारख्या करून पुरल्या जातात. ह्याचे कारण काय? जेव्हा स्वतःच्या घरात ही घटना घडेल त्या नंतर ह्या गुन्ह्यावर आक्षेप घेतला जेइल का? हा विचार कधी कोणी केला आहे की आज कोणा दुसर्या स्त्रीवर हा अत्याचार घडला, उद्या ती स्त्री तुमच्या घरातली असू शकते आणि लैंगिक छळवाद करणारा अनोळखी मनुष्य नसून तुमच्या परिचयाचाच असू शकतो. तेव्हा पण त्या अत्याचारी व्यक्तीला सुशिक्षित आणि उच्च घराण्यातला समजून क्षमा केले जेइल का? केवळ लैंगिक छळवाद आहे आणि त्यातून काही अपाय झाला नाही म्हणून तो गंभीर गुनाह नाही असं वाटतं का? शारीरिक अपाय झाला नसला तरी त्या व्यक्तीला झालेला मानसिक छळवाद ह्याची गंभीरता कोणी लक्षात घेत नाही. हे पाहून खंत होते की प्रत्येक्जण केवळ आपला स्वार्थ पाहून आपली प्रतिक्रिया देत असतो आणि ह्या अन्यायाला जाणीवपूर्वक साथ देत असतो.
आई वडिलांची शिकवण कधीचीच खोटी ठरली की धोका केवळ अनोळखी माणसां काढून असतो आणि आपण केवळ त्यांच्या बरोबर असुरक्षित असतो. आयुष्यात अश्या बर्याच घटना पहिल्या, ऐकल्या आणि वाचल्या ज्या मुळे हा विश्वास बसत गेला की 'विश्वास' हा शब्दच मुळात दुर्मिळ होत चाललाय. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हा शेवटी जुगारच आहे. हल्ली टी. व्ही वर किव्हा व्रुतपत्रात अतिशय धक्कादायक बातम्या पहायला आणि वाचायला मिळतात. बलात्कार आणि लैंगिक छळवणूक ह्या बातमी शिवाय हल्लीच्या बातम्या पूर्ण होताच नाहीत. बातमी प्रसिद्ध झाली की काही दिवस त्या बातमीची चर्चा होते. एक विषय मिळतो लोकांना गप्पा मारायला कि,"अरेरे असं कसं झालं ?","बिच्चारी!", किंव्हा काही जण केवळ उत्सुक असतात हे जाणून घ्यायला कि," काय केलं?", "कसं केलं?,"काय झालं नेमका?" बस ! ह्या वाक्यांच्या पुढे जाण्याची न त्यांच्यात हिम्मत असते न क्षमता.
'फेसबुक' वर बर्याच जणांनी काही बालात्काराच्या बातम्या आणि त्या गुन्ह्याला बळी गेलेल्या स्त्री बद्दल सहानुभूती प्रकट केली. परंतु त्या पुढे काय? 'रात गायी बात गायी", नाही का? चार दिवस चर्चा झाली. 'फेसबुक वर आपले मत व्यक्त केले, दुसर्यांच्या वाक्यांना 'लाइक' केले, काही त्या विषयावर वाद विवाद करण्यासाठी सज्ज झाले आणि पाचव्या दिवशी वेगळ्या विषयावर चर्चा करायला मोकळे. ह्या गंभीर विषयाला हाताळण्याची किंव्हा त्याचा तोड काढण्याची एका माधेही क्षमता नाही परंतु 'ग्यान' देणारे बरेच दिसले. 'बलात्कार' सारख्या गुन्ह्याला जन्मठेप द्यावी अशी दर्ख्वास्त काही जणांनी केली जेव्हा हे पाप उघडकीस आले परंतु 'लैंगिक छळवणूक' इतकी सामान्य गोष्ट झाली आहे की ह्या घटने कडे दुर्लक्ष केले जाते. " असं घडतच." "कोणत्याही क्षेत्रात ह्या घटना सामान्य आहेत." असे म्हणणारे सुद्धा आहेत. म्हणजेच आपण ह्या गुष्टी आपल्या सर्व सामान्य जीवनाचा भाग समजून स्वीकारायच्या का? हा अत्याचार तुमच्या घरात कोणावर घडला तरी तुमचे हेच मत राहील का? ह्या अत्याचाराला कसलाच तोड नाही का? असे बरेच प्रश्न माझ्या मनात येतात आणि दुर्दैवानी उत्तर सुद्धा माहिती अस्त की, ह्या अपराधाला आणि अपराध करणार्याला भारतात शिक्षा मिळणे अश्यक्य आहे कारण ह्या अपराधाला शिक्षा मिळालीच तर आपल्या देशाची लोकसंख्या निम्मी होण्याची शक्यता आहे.
ह्या सगळ्या अनुभवातून एक विचार मनात आला आणि तो म्हणजे, आपल्या मुलांना 'विश्वास' ह्या शब्दावर 'विश्वास' ठेवायला शिकवायचे की नाही? कवी चंद्रशेखर गोखले म्हणतात, "असे बेसावध क्षणच सावधपणे टाळायचे असतात, जवळ येतानाच दुराव्याचे काही नियम पाळायचे असतात." परंतु मग विश्वास ठेवायचा तर कुणावर आणि नाही ठेवायचा तोः कुणावर? 'विश्वास ह्या शब्दाची व्याख्याच दुर्दैवानी बदलत चालली आहे कारण हा अनुभवच आता मुळात दुर्मिळ होत चाललाय. मुलींना जर हि शिकवण दिली कि कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेऊ नये तर त्या मुलीचा प्रेमावरचा विश्वास पण मिटून जाईल. कोणाच्या मनात प्रेम आहे आणि कोणाच्या केवळ वासना ह्या दोघां मधला फरक जाणून घेणे कठीणच आहे. ह्यामुळे प्रत्येकाची वायात्तिक नाती सुद्धा अतिशय कमकुवत होत चालली आहेत.
ह्या निरागस मुलांना ह्या अश्लील जगात पाठवताना मन हूरहूरतं. 'विश्वास' एकदा तुटला की तो पुन्हा मिळवणं अशक्य आहे. 'विश्वास एका आरश्या सारखा आहे जो कधी तुटला तर पुन्हा अखंड होऊ शकत नाही. मत्प्रयासाने जरी तो आरसा जोडला तरी त्यावर तुटलेल्याची निशाणी म्हणून एक बारीक रेष तरी आढळून येतेच. उच्चारलेला शब्द सुद्धा मागे घेऊ शकत नाही जसा कमानीतला तीर सुटल्यावर मागे घेता येत नाही. माझे प्रामाणिक मत आहे कि 'विश्वास' हा शंभर टक्के असतो किव्हा शुन्य. जर तो विश्वास तुटला तर कितीही जोडला किंव्हा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला तरी तो अखंड होऊ शकत नाही. त्यामुळे मी माझ्या मुलांना इतकेच सांगते कि, 'असे कधीही वागू नये ज्यामुळे आपल्यावरचा विश्वास शुन्य होईल." जर विश्वास अखंड राहील तरच तुमची नाती अखंड राहतील नाहीतर पुढच्या पिढीला 'विश्वास' आणि 'नाती' काय असतात हे समजावणे कठीण जाईल.
जशी प्रत्येक गुन्ह्याला शिक्षा ही हवीच तसेच लैंगिक छळवाद करणार्यांना सुद्धा तेवडीच कडक शिक्षा मिळायला हवी. अश्या गुन्हेगारांना शरण देणारे त्याहून मोठे गुन्हेगार असतात आणि हे गुन्हे तेव्हाच बंद होतील जेव्हा गुन्हेगाराला शरण न देता त्याचा गुनाह सर्वां समोर उघडकीस केला जाईल. गुनेह्गाराला साथ देणारे व्यक्ती गुनाह लपवण्याचे पाप करून त्या गुन्हेगाराची शिक्षा वाचवतात आणि हा विषय केवळ एक चर्चेचा विषय बनून अस्तित्वात राहतो परंतु त्या घटनेचा परिणाम त्या बळीवर अपायकारक ठरतो. ह्या लैंगिक छळवाद वर तोडगा काय? आपली मुलं जेव्हा ह्या जगात पाऊल टाकतील तेव्हा त्यांना सावध करण्या पलीकडे अजून बर्याच गोष्टी आहेत ज्यामुळे ते माणसांची ओळख पटवू शकतील आणि देवाच्या कृपेने काही खरी नाती जपू शकतील. त्यांना सावध करण्याची जबाबदारी आपलीच आहे.
शेवटी मनुष्य एकटा येतो आणि एकटा जातो. माणसांची खरी ओळख त्याला त्याच्या खाजगी अनुभवातूनच येते. कधी असतो आपण घोळक्यात तर कधी त्या घोळक्यात सुद्धा एकटेच असतो कारण मनात एक भीती असते की, "विश्वास ठेवायचा तोः कुणावर?" हा विचार माझ्या मनात कायम येत असतो. तुमच्याही आला का? पुढच्या पिढीला आपली आणि आपल्या अनुभवाची गरज आहे. त्यांना योग्य मार्ग समजावा, त्यांनी योग्य निर्णय घ्यावा आणि त्यांना सत्याला साथ देण्याची ताकत मिळावी ह्याची खबरदारी आपणच घेऊ शकतो. तर इथून पुढे जाताना जरा विसावू ह्या वळणावर, की आपल्या पुढच्या पिढीला कसे सावध करायचे आणि ह्या अत्याचाराला सामोरे जाण्यासाठी कसे सशक्त बनवायचे. आयुष्याच्या खेळात जो 'विश्वास' दुर्मिळ होत चाललाय त्यावर चार ओळी मनात आल्या त्या जाता जाता आपल्या समोर सदर करते, "यु तो साथ होते है सब, पर फिर भी कोई साथ नाही, यु तो करते है अपना होने का दावा, पर ये साया भी तो अपना नाही."
No comments:
Post a Comment